हा ब्लॉग शोधा

वाद वेदोक्ताचा - 3


वाद वेदोक्ताचा - 3

वेदोक्त प्रकरणाचा वणवा पेटला तो एका उर्मट, बाहेरख्याली भिक्षुकाच्या उद्धट उद्गारांनी. 

तो 1899 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा काळ होता. नेहमीच्या रिवाजानुसार त्या काळात शाहू छत्रपती पंचगंगेवर कार्तिकस्नानासाठी गेले होते. त्यांच्या स‌मवेत बरीच मंडळी होती. त्यात विख्यात ग्रंथकार राजारामशास्त्री भागवत हेही होते. महाराज स्नान करीत होते. नारायणभट नावाचा ब्राह्मण मंत्र म्हणत होता. पण तो वेदोक्त नव्हे, तर पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे राजारामशास्त्री भागवतांच्या बरोबर लक्षात आले. त्यांनी ती गोष्ट महाराजांना सांगितली. महाराजांनी नारायण भटाला त्याबाबत विचारले. तेव्हा तो म्हणाला, शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगायचे असतात. ते म्हणण्यापूर्वी भटजीने स्वतः आंघोळ केली नसली तरी चालते. त्याच्या या जबाबाने महाराज साहजिकच संतापले. 

कोल्हापूर छत्रपतींच्या पदरी असलेल्या सोळा शास्त्री घराण्यांपैकी एका घराण्यातील शास्त्री बाळाचार्य खुपरेकर यांनी याबाबतची आपली आठवण सांगितली आहे. त्यानुसार हा नारायण भट बाहेरख्याली होता. "या घटनेच्या आदल्या रात्री त्याचे त्याच्या बायकोशी कडाक्याचे भांडण झाले होते व त्याने तिला मारहाणही केली होती. पहाटे वाड्यावरची गाडी आली, तेव्हा त्या भटजीच्या बायकोने ते घरात नाहीत म्हणून सांगितले. कुठे गेले म्हणून विचारल्यावर, गेले शेण खायला असे उत्तर दिले. गाडीवानाने अर्थ स‌मजून वेश्यावस्तीत जाऊन त्याला शोधून काढले व घरी जाण्यासाठी गाडी वळवली व आंघोळ लवकर उरकायला सांगितले. त्यावेळी आपले बिंग बाहेर पडले व आपली छीथू होणार हे पाहून रागावलेल्या स्थितीत त्याने हे उद्गार काढले. हुज-याने महाराजांना हा प्रकार सांगताच त्यांनी त्याला चाबकाने फोडून काढले. महाराज म्हणाले, आम्ही श्रद्धेने तुम्हाला नमस्कार करतो आणि तुम्ही असले आचरण ठेवूऩ वर गाढवासारखं बडबडता! (1)

1901च्या भाद्रपदातील पितृपक्षात महाराज पन्हाळगडावर राहात होते. तेथे श्राद्धासारखी धर्मकृत्ये करण्यासाठी त्यांनी नारायण स‌दाशिव ऊर्फ अप्पासाहेब राजोपाध्ये यांना बोलावणे पाठविले. हे राजोपाध्ये म्हणजे कोल्हापूरकर भोसल्यांचे कुलगुरू व कुलोपाध्याय होते. पण ते छत्रपतींच्या घरची धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने करण्यास तयार नव्हते. तेव्हा 7 ऑगस्ट 1901ला महाराजांनी लेखी आदेशच दिला. राजवाड्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीनेच केली जावीत असे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते. पण राजोपाध्यांनी या आदेशाची अंमलबजावणी काही काळ स्थगित ठेवावी अशी विनंती केली. 

अशात नवरात्र उजाडले आणि कोल्हापूरात देवी विटाळल्याची बोंब झाली.ते प्रकरणही औरच होते. कोल्हापूरात नारायणशास्त्री गोविंद सेवेकरी वैद्य नावाचे ब्राह्मण होते. ते वेदोक्तास अनुकूल होते. त्यांनी 29 ऑगस्ट 1901 रोजी वेदोक्त पद्धतीने मराठ्यांची श्रावणी केली. बापूसाहेब कागलकरांचीही श्रावणी त्यांनी केली. त्यामुळे स‌नातन्यांनी त्यांना वाळीत टाकले होते. या नारायणशास्त्र्यांनी 14 ऑक्टोबर 1901 रोजी अंबाबाईच्या देवळात जाऊन पूजा केली. शाहू छत्रपतींनीच त्यांना पूजेसाठी पाठविले होते. पण त्यांच्या स्पर्शाने देवी विटाळली असा आरडाओरडा स‌नातनी ब्राह्मणांनी केला. नारायणशास्त्रांना वाळीत टाकले असल्याची माहिती स‌नातन्यांच्या वतीने तेरा भिक्षुकांनी नायब कारभा-यांच्या कानावर घातली. याच तेरा भिक्षुकांनी नंतर शाहू छत्रपतींचीही भेट घेतली. तेव्हा छत्रपतींनी या तेरा जणांना देवळात प्रवेश करण्यास मनाई केली. तेव्हा ही ब्राह्मणमंडळी शाहू छत्रपतींच्या विरोधात इंग्रज स‌रकारकडे गेली. या ब्राह्मणांशी महाराजांच्याच कुलगुरूने हातमिळवणी केली असल्याचे नंतर स्पष्ट झाले. 

अप्पासाहेब राजोपाध्ये हे महाराजांचे कुलगुरू व कुलोपाध्याय. तेच वेदोक्ताच्या विरोधात होते, हे पाहिल्यावर मग महाराजांनी त्यांनाही धडा शिकविण्याचा निर्धार केला. 26 ऑक्टोबर 1901 रोजीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राजवाड्यावर जी धर्मकृत्ये करायची, ती वेदोक्ताने करणार नसाल, तर वाड्यावर येऊ नका, असा निरोप त्यांना छत्रपतींनी पाठविला. त्यानंतर रोजच स‌काळी त्यांना असाच तोंडी निरोप पाठविण्यात येत असे. हा प्रकार 8 नोव्हेंबरपर्यंत चालला. राजोपाध्ये पूजेस येत नव्हते आणि म्हणून त्यांना दक्षिणाही दिली जात नव्हती. 

याच सुमारास लोकमान्य टिळकांनी आपली लेखणी परजली आणि राजोपाध्यांच्या बाजूने त्यांनी 22 व 29 नोव्हेंबरच्या अंकात वेदोक्तावरचे अग्रलेख लिहिले. तेव्हाची बहुतेक वृत्तपत्रे ब्राह्मणांच्या हातातील असल्याने त्यांनीही शाहू छत्रपतींच्या विरोधात जणू आघाडी उघडली. टिळकांचा केसरी-मराठी तर त्यात होताच, पण प्रा. विजापूरकरांच्या प्रभावाखालील स‌मर्थ साप्ताहिक, शंकरशास्त्री गोखले यांचे विद्याविलास हे साप्ताहिक, साता-याचे प्रतोद, वाईचे भाऊशास्त्री लेल्यांचे मोदवृत्त, सोलापुरचे कल्पतरू, ठाण्याचे अरूणोदय व हिंदूपंच, नाशिकचे गुराखी या नियतकालिकांनीही छत्रपतींच्या विरोधात प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. स‌ावळाराम अमृतराव विचारे यांचे मराठा दिनबंधु हे कोल्हापुरातले वृत्तपत्र त्यांना आपल्यापरीने उत्तर देत होते. पण या स‌र्व कोलाहलात त्याचा आवाज कोणाला ऎकू जाणार? 

वेदोक्ताच्या प्रकरणातील स‌त्य शोधण्यासाठी याच सुमारास शाहू छत्रपतींनी एक स‌मितीही नेमली. रा. ब. कृष्णाजी नारायण पंडित, स‌रन्यायाधीश विश्वनाथ बळवंत गोखले आणि विशेष म्हणजे आप्पासाहेब राजोपाध्ये या तिघांचा या स‌मितीत स‌मावेश होता. 16 एप्रिल 1902 रोजी या स‌मितीने आपला अहवाल दिला. छत्रपती बाबासाहेब महाराज (1837-1866) यांच्या कारकीर्दीपर्यंत कोल्हापूरच्या राजघराण्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीनेच केली जात होती. बाबासाहेब महाराजांची मुले जगत नव्हती, तेव्हा रघुनाथशास्त्री पर्वते यांच्या स‌ल्ल्यावरून काही गृहकृत्ये पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरूवात करण्यात आली. हे पाहता छत्रपतींना वेदोक्त पद्धतीने गृहकृत्ये करायची असल्यास त्यांना ती करता येतील, अशी शिफारस स‌मितीने केली. पण या अहवालावर स‌ही करण्यास राजोपाध्ये यांनी नकार दिला. स‌मितीपुढे साक्ष देण्यास येण्यास बाहेरचे लोक येत नव्हते, महाराजांचे अधिकारी दबाव आणित होते, असा त्यांचा आरोप होता. पण विशेष म्हणजे स‌मितीचे कामकाज त्यांच्याच घरात पाच महिने चालले होते, त्यावेळी मात्र ते याबाबत चकार शब्दानेही बोलले नव्हते. तेव्हा अहवाल प्रतिकूल जाताच त्यांनी त्यास विरोध दर्शविला हे उघड आहे. अखेर शाहू महाराजांनी 6 मे 1902 रोजी राजोपाध्ये यांना रीतसर राजोपाध्येपदावरून काढून टाकले. त्यांची स‌र्व इनामे, वतने व त्यांचे दिवाणी, फौजदारी व महसूलविषयक अधिकार काढून घेतले. या निर्णयामुळे तर मोठाच गदारोळ झाला. राजोपाध्यांच्या पाठिराख्यांनी तर महाराजांविरोधात जणू बंडच पुकारले. अशा वातावरणात महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी एक परिपत्रक काढून कोल्हापूरातील स‌रकारी नोक-यांत मागासवर्गीयांसाठी 50 टक्के आरक्षण जाहीर केले. यामुळे तर ब्राह्मणवर्गात संतापाची लाट उसळली. केसरी-मराठ्यासकट स‌गळी ब्राह्मणी वृत्तपत्रे महाराजांवर तुटून पडली. 

या वादाने किती उग्र रूप घेतले होते, ते महाराजांच्या दत्तक राजमातेचे निधन झाले तेव्हाच्या घटनांतून दिसून येते. 14 स‌प्टेंबर 1902 रोजी चौथ्या शिवाजीराजांच्या पत्नी मातोश्री आनंदीबाई राणीसाहेब यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी वेदोक्त पद्धतीने करण्यात येत होता, तर त्याला तेथेच काही ब्राह्मणांनी विरोध केला. त्यावर मोठी वादावादी झाली. अखेर अंत्यस‌ंस्कार वेदोक्त पद्धतीनेच करण्यात आले. त्याच दिवशी मध्यरात्री जुन्या राजवाड्याला आग लागली. ही आग काही उपद्व्यापी ब्राह्मणांनीच लावली असावी असा महाराजांना संशय होता. या आगीत जुन्या राजवाड्यातील प्रचंड दप्तरखाना खाक झाला. दुस-या दिवशी सकाळी कोल्हापुरातल्या अनेक घरांवर रक्ताची बोटे उमटलेली लोकांनी दिसली. हा महाराजांना 'इशारा' होता! 

तिकडे राजोपाध्ये यांचे आपले इनाम व वतन वाचविण्याचे प्रयत्न सुरूच होते. त्यांनी प्रथम गव्हर्नरकडे अर्ज केला होता. पण गव्हर्नरने छत्रपतींच्या बाजूने निकाल दिला. तेव्हा राजोपाध्यांनी थेट गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झनकडे धाव घेतली. पण तेथेही राजोपाध्यांचा पराभव झाला. या निकालाने लोकमान्यांना मोठेच दुःख झाले. त्यांनी लिहिले, "राजोपाध्ये यांचे इनाम संस्थानात सामील झाले. याच न्यायाने पुढेमागे कोल्हापूर संस्थान इंग्रजी राज्यात सामील झाल्यास लोकांस‌ही स‌माधान वाटेल." राजोपाध्यांचे इनाम जप्त केल्याने संतापलेले लोकमान्य कोल्हापूर संस्थान जप्त करावे, असे सुचवित होते. जणू छत्रपतींनी राजोपाध्यांवर मोठा अन्यायच केला होता. वास्तविक त्यांचे इनाम हे चाकरी इनाम होते. पगाराप्रमाणे. काम करा, पगार घ्या, काम बंद, पगार बंद असे. जेव्हा चाकरी बंद तेव्हा इनामही बंद अशी त्याची कायदेशीर बाजू होती व ती लोकमान्य विसरले होते. 

कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदाप्रमाणेच तेथील शंकराचार्यही वेदोक्ताच्या विरोधात होते. शंकराचार्यांच्या मठावर 23 फेब्रुवारी 1903 रोजी काशीनाथ गोविंद ब्रह्मनाळकर या कीर्तनकाराची नेमणूक झाली. हा ब्रह्मनाळकरबुवा म्हणजे एक प्रकरणच होते. संन्याशी झाला, तरी त्याची धनसंपत्तीची हाव संपली नव्हती. पुढे त्याने त्या मठात एवढे गैरव्यवहार केले, की या पदाची सर्व इज्जत त्यांनी धुळीस मिळवली. लेलेशास्त्र्यांनीच पुढे त्यांच्या या लीला उजेडात आणल्या. ते भस्मात अत्तर घालून ते अंगास चोपडित असत. पानतंबाखू खात असत. झोपण्यासाठी शंकराचार्यांना मखमखलीच्या गाद्या लागत आणि ते नेहमी बायांकडून अंग रगडून घेत असत, वगैरे गोष्टी सांगून लेलेशास्त्र्यांनी त्याचा हा संन्याशाचा संसार किती विलासी होता, हे लोकांसमोर आणले. पण हे कधी तर शंकराचार्यांनी वेदोक्तास संमती दिली त्यानंतर. तत्पूर्वी शंकराचार्य ब्रह्मवृंदाचे नेतेच होते. शंकराचार्यांनी, शाहू महाराज हे शूद्र असल्याने त्यांना वेदोक्ताचा अधिकार नसल्याचे मत दिल्यावर शाहू महाराजांनी त्यांनाही दणका दिला. त्यांनी मठाची स्थावरजंगम मालमत्ता जप्त करून स्वामीचे स‌र्व धार्मिक अधिकार बरखास्त केल्याची राजाज्ञा काढली.(मे 1903)

त्यामुळे चवताळलेल्या ब्रह्मनाळकरबुवांनी मग हवी तशी मुक्ताफळे उधळण्यास सुरूवात केली. ब्रह्मवृंदाची जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात दौरा काढला. पुण्यात त्यांची पालकी वाहणा-यांत लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे अशी खाशी मंडळी होती. याच दौ-यात त्यांचा मुक्काम महाड येथे असताना तेथील प्रभू जातीच्या काही लोकांनी त्यांची पाद्यपूजा वेदोक्त मंत्र म्हणून करण्याचे ठरविले. पण त्यांनी व महाडच्या ब्राह्मणांनी तो बेत हाणून पाडला. याच वेळी शंकराचार्यांच्या या उत्तराधिका-याने शिवछत्रपती क्षत्रिय नव्हते व त्यांनी गागाभट्टाला लाच देऊन आपले क्षत्रियत्व मान्य करून घेतले, त्यामुळे शिवाजीच्या घराण्याचा स‌त्यानाश झाला, असे उद्गार काढले. 

पण आता या वादात छत्रपतींचीच स‌रशी होणार अशी चिन्हे दिसू लागली होती. राजोपाध्यांना इंग्रज स‌रकारने मोठी आशा होती. पण आता ती मावळली होती आणि त्यामुळे ब्रह्मवृंद आणि शंकराचार्यही हवेतून जमिनीवर उतरले होते. 

शेवटी या प्रकरणात तडजोड झाली आणि जुलै 1905 मध्ये छत्रपतींचे भोसले घराणे क्षत्रिय असल्याचे आणि त्याला वेदोक्ताचा अधिकार असल्याचे शंकराचार्यांनी मान्य केले. 20 डिसेंबर 1905 रोजी कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदाने स‌भा घेऊन शंकराचार्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि पाच-सात वर्षे चाललेला हा संघर्ष छत्रपतींच्या विजयाने समाप्त झाला. 

पण हा संघर्ष खरेच स‌माप्त झाला? 

1 जून 1909 च्या धर्म पाक्षिकात लेलेशास्त्र्यांनी लिहिले, "शूद्राला वेदाधिकारदान, गुरूद्रोह इत्यादी पातकांमुळे" ब्रह्मनाळकरांना क्षयरोग झाला! 


संदर्भ - 
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती 1986, पाने 62 ते 97
- वेदोक्त प्रकरण - ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा खडा संघर्ष - डॉ. जयसिंगराव पवार, राजर्षि - राज्यारोहण शताब्दी विशेषांक, रविवार दिनांक, 3 एप्रिल 1994.

14 comments:

  1. रा.रा. विसोबा काका
    माफ करा पण माझ्यासारख्या अडाण्याला पहिले वेदोक्त पध्दत आणि पुरोणोक्त पध्दत यातील फरक सांगा...

    शाहू महाराजांबद्दल थोडी माहिती यात मिळाली आहेच पण मी अपेक्षेत केलेली माहिती जेव्हा द्याल तेव्हा महाराजांच्या जन्मापासुन म्रुत्युपर्यंत घडलेले महत्वाचे, दोन्हि पैलू दाखवणारे प्रसंग सांगावेत ही विनंती...माहीति मोठिच आहे... नाहितर शाहू महाराजांवर लिखित एखाद्या पुस्तकाचे नाव सांगा..

    Reply
    Replies
    1. Chatrapati shahu maharaj gaurav granth..

  2. रा.रा. विसोबा काका,

    लेख आवडला. तुमची लेखनशैली प्रवाही आणि रसाळ आहे. अल्पाक्षरी शब्दयोजनेमुळे कमी शब्दांमध्ये खूप सारे सांगून जाता. पुढील लेखाची आतुरतेने वाट पाहत आहे. 

    महाराष्ट्राच्या इतिहासातील कुप्रसिद्ध ब्राम्हण - ब्राम्हणेतर वादाचे मूळ असलेला वाद तो हाच का?

    Reply
  3. mag tilakanna lokamanya padavi koni dili buaa?

    he sagale tyanche wedoktanche laad tyanni palale nahit mhanun tar haa manus Engrajanshi bhandala nahi na?

    Jati bheda itaka jya manasachya manat asel to lokmanya hou shakat nahi

    -Hemant

    Reply
  4. विसोबा काका तुमचा लेख फारच आवडला.

    Reply
  5. हेमंत यांच्या मताशी सहमत आहे. टिळकांसारख्या राष्ट्रपुरुषाने जर अशा पद्धतीचा जातीयवाद पाळला तर, त्यांना राष्ट्रपुरुष तरी का मानावे? म्हणजे एकीकडे देशासाठी भांडण्याचा आव आणा्यचा आणी दूसरीकडे आपल्याच देशबांधवांना हिन वागणूक द्यायची.मग शिवजयंती सारखा उत्सव सुरु करायची तरी काय गरज होती?की तेही आपली ’इमेज’ वाचवण्याचे एक राजकारण होते?

    Reply
  6. good work ... 
    greate people greate histry .
    upload lot of new bloogs .
    once again thanks

    Reply
  7. atyanta utkrushta lekh aahe. wicharancha navin khadya milale.

    Reply
  8. lekha ava
    dala.....

    Reply

  9. वेदोक्त. तीनही लेख सुंदर. या वादात त्या काळी अनेक इंग्रज अभ्यासकांनी आपली मते मांडली होती, असे वाटते. AMT Jackson (नाशिकचे कलेक्टर) यांनी शिवाजी व जातीव्यवस्था याचे विवेचन करणारा सप्टेंबर १९०६ च्या एम्पायर रिव्यू च्या अंकात लिहिला होता असे मी हर्बर्ट रीसली यांच्या पुस्तकात वाचले आहे. अन्य कुणी काही लिहिले असे तुम्हास माहित असेल तर कळवा 

    Reply
  10. rajalahi jativevaste virudh ladtana naki-nau ale hot,mang samanyanche kai hal asel,phakt vichar kelelach bara. tethe agarkaranchi philosophy kashi pachni padali asel. good work.

    Reply
  11. नमस्कार सर
    ती तडजोड जी झाली ती उदगाव या गावी झाला इथे छत्रपती शाहू महाराज 15 दिवस राहिले होते..अस माझ्या वाचनात आले आहे तसा संदर्भ आपल्या लेखनात नाही दिसला...तुमची लेखणी अप्रतिम आहे.. पण उदगाव हे माझं गाव..माझ्या गावचा ऐतिहासिक वारसा हा खूप मोठा...

    Reply
    Replies
    1. संदर्भ…shahu chatrapati. by..keer d.v
      Page no 142,143


वाद वेदोक्ताचा - 2सर्व क्षुद्रांचा गलबला!



वाद वेदोक्ताचा - 2

सर्व क्षुद्रांचा गलबला!

तुमचे शिवाजी महाराज असतील शककर्ते, किंबहुना ते नसते तर आमची सुंता वगैरे झाली असती असे जे कवि भूषणने म्हटले ते आम्हालाही मान्यच आहे. त्यासाठी आम्ही त्यांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणू. पण त्यांना आम्ही क्षत्रिय मात्र म्हणणार नाही, कारण कलीत क्षत्रिय नाहीत, अशी अवघी पुराणमतवादी मानसिकता होती. गागाभट्टाने त्यांना आधी शूद्र म्हटले ते यातूनच. 

त्याचे असे झाले, की शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांच्या मुलाचा व्रतबंध करायचा होता. ते ऎकल्यावर पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी त्यांची कुचेष्टाच केली. कारण बाळाजी आवजी हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. आणि ब्राह्मणांच्या लेखी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ही जात तर वर्णसंकरातून तयार झालेली. तेव्हा त्यांना कसले आले वेदोक्त कर्माचे वगैरे अधिकार ! पण कायस्त प्रभूंना मात्र हे मत मान्य नव्हते. त्यांच्या मते ही क्षत्रिय जात असून, 'गोविंदभट्टी' या ग्रंथानुसार पंधराव्या शतकात त्यांचा वेदाधिकार मान्य झालेला आहे आणि स‌न 1663मध्ये कायस्थ प्रभूंचा मुंजीसारखे संस्कार करण्याचा अधिकार प्रस्थापित झालेला आहे. पण तरीही 1669 साली मोरोपंत पिंगळ्यांनी प्रभूंना हा हक्क नसल्याचे म्हटल्यावर बाळाजी काशीच्या पंडितांकडे धाव घेतली. पण हाय रे चिटणीसांचे दैव! काशीच्या विद्वान ब्राह्मणांनी महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या म्हणण्यावरच शिक्कामोर्तब केले. त्यांनी बाळआजी आवजींनाच शूद्र ठरविले असे नाही, तर शिवाजी महाराजांनाही ते क्षत्रिय नस‌ल्याने छत्रसिंहासनाचा अधिकार नाही, असा निर्णय दिला. तशा आशयाचे गागाभट्ट या पंडिताचे पत्र घेऊन केशवभट्ट पंडित, भालचंद्रभट्ट पुरोहित आणि सोमनाथभट्ट कात्रे महाराष्ट्रात आले. हा निर्णय पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी निळो येसाजी प्रभू पारस‌नीस यांना काशीला पाठविले. त्यानंतर गागाभट्ट स्वतः रायगडावर आले आणि त्यांचे मत बदलल्याने त्यांनी शिवाजी महाराजांना वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला. 

महाराष्ट्रातल्या स‌नातनी ब्रह्मवृंदाला मात्र गागाभट्टांची ही करणी कधीच पसंत पडली नाही. वाई येथून निघणा-या 'धर्म' या साप्ताहिकाचे संपादक काशिनाथ वामन ऊर्फ भाऊशास्त्री लेले यांनी तर असे जाहीर केले, की शिवाजी महाराजांना वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक करणारे गागाभट्ट काशीकर हे शिवाजी महाराजांचे उपदेशगुरूही नव्हते व कुलगुरूही नव्हते, तर ते एक भाडोत्री विद्वान होते. "जातिविषयक प्रश्न उपस्थित झाल्यास शिवाजी महाराज शूद्र होते असे एक वेळच नव्हे परंतु अनंत वेळा जरी 'धर्म'संपादकाने प्रसिद्ध केले तरी त्यात त्याचा अपराध तो काय होणार आहे?" असा लेलेशास्त्रींचा स‌वाल होता. 

तिकडे स‌याजीराव गायकवाड जेव्हा वेदोक्ताबाबत ब्राह्मण पंडितांचा स‌ल्ला घेत होते, तेव्हा राजारामशास्त्री टोपले हे महाराजांना इषारा देत होते, की "महाराज, आपण क्षत्रिय आहात वगैरे गोष्टी ख-या, परंतु या नव्या भानगडीत आपण पडणे इष्ट नाही, वेदोक्त हे विष आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून त्याजबद्दलचा हट्ट धरला त्यांचे कल्याण झाले नाही. त्यांच्या राज्यास अवनती प्राप्त झाली. स‌बब त्या विषाची परीक्षा आपण पाहू नये. " शिवछत्रपती शूद्र असताना त्यांनी वेदोक्त पद्धतीने आपणांस राज्याभिषेक करवून घेतला त्यामुळे त्यांना फार काळ राज्य लाभले नाही आणि त्यांच्या नंतर त्यांनी स्थापिलेल्या स्वराज्यावर गंडांतरे आली आणि राज्याचे तुकडे पडले. प्रा. विष्णु गोविंद विजापूरकर यांनी तर याहीपुढे जाऊन लिहिले, की "शककर्ते शिवाजी महाराजांस ज्यांनी रायगडी राज्याभिषेक केला व 'क्षत्रियकुलावतंस' म्हटले त्यांचे (गागभट्टांचे) निधन शौचकूपात पतन पावून झाले अशी दंतकथा आहे. एकंदर काय बीज असेल ते असो. 'परमेश्वरो वै वेत्ति' मूळ अस्सल क्षत्रियकुळी असेल परंतु स‌हवास व शरीरसंबंधांचा परिणाम देवास आवडत नसेल." 

शिवछत्रती क्षत्रिय असून, त्यांना छत्रसिंहासनाचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी बाळाजी आवजीने मोठी मुत्सद्देगिरीची कामगिरी केली. त्यांनी काय केले, तर भोसल्यांच्या वंशावळीचा धागा थेट उदेपूरच्या रजपूत राजघराण्याशी नेऊन भिडविला, असे प्रबोधनकार ठाकरे सांगतात. पण हे तरी स‌नातनी ब्राह्मणांना कुठे मान्य होते? त्या थोर ब्रह्मवृंदाचा धोशा एकच होता. कलीत क्षत्रिय नाहीत, असे स्मृती सांगत असल्याने रजपुतांना तरी क्षत्रिय कसे म्हणता येईल? लेलेशास्त्री लिहितात, "रजपूत हे क्षत्रिय नसून ते त्याहून निराळे आहेत. संस्कृतमध्ये त्यांना उग्र असे नाव आहे. त्यांची कर्मे गागाभट्टाच्या वंशातील गागभट्टापासून तिसरा पुरुष जो कमलाकरभट्ट त्याने शूद्र कमलाकरात सांगितली आहेत... शूद्रजातीय स्त्रीचे ठिकाणी क्षत्रियापासून जो पुत्र उत्पन्न होतो त्याची जाती उग्र ही होय. शिवाजी हा रजपुतांचा वंशज होता असे जरी मानिले तरीही तो क्षत्रिय ठरणे मुळीच शक्य नाही. शिवाय शिवाजी हा जर क्षत्रिय असेल, तर विवाहापूर्वीच त्याचे उपनयनही व्हावयास पाहिजे होते, परंतु तसे मुळीच झालेले नाही. आजच्या मराठे जातीस एका विवाहावाचून दुसरा कोणताही संस्कार मुळीच माहीत नाही, हे निर्विवाद आहे.... 'विवाहमात्रं संस्कारं शूद्रोSपि लभते स‌दा' (शूद्रासही विवाह हा एकच संस्कार प्राप्त होतो) या स्मृतिवचनाप्रमाणे मराठे हे शूद्रच आहेत असे मानणे भागच आहे."

अर्थात जातीदंभ केवळ स‌नातनी भटभिक्षुकांमध्ये होता असे मानण्याचे काही कारण नाही. सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी पंडितांची महासभा घेऊन स‌र्व मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध करून घेतले. पण मग त्यांनाही ही जातिश्रेष्ठत्वाची बाधा झाली. स‌र्व मराठे क्षत्रिय आहेत हे या पंडितसभेत मान्य झाल्यानंतर ते स्वतःस सिसोदे राजे भोसले असे म्हणवून घेऊ लागले आणि ग्वाल्हेरचे शिंदे, अक्कलकोटचे भोसले आणि बडोद्याचे गायकवाड यांना कुणबी म्हणून कमी लेखू लागले. "अलीकडे कुणबी वगैरे पैकेकरी होऊन या ज्ञातीत फितुर करून बाटवितात. (सोयरिका करतात) हे जाहल्यास धर्म राहणार नाही... हिंदुस्थानात शिंदे वगैरे कुणबी लोक आहेत त्यास ताकीद जाली पाहिजे... गायकवाडाची सोयरिक करू तरी कासीत मात्रागमन केल्याचे पातक" अशी छत्रपती प्रतापसिंहांची स‌मजूत होती. 

स‌याजीराव गायकवाड, शाहू महाराज यांनी वेदोक्ताचा आग्रह धरल्यानंतर असा हा स‌र्व क्षुद्र मतांचा गलबला सुरू होता.

बडोद्यास स‌याजीराव गायकवाडांना या शूद्रत्त्वाचा मोठा मानसिक त्रास होत असल्याने त्यांनी वेदोक्ताचा आग्रह धरला. पण त्याला तेथील ब्रह्मवृंद त्यास तयार नव्हता. तेव्हा मग त्यांनी स‌रळ आपल्या सेवेतील ब्राह्मणांची हकालपट्टी करून, त्यांऎवजी गुजराती, मारवाडी ब्राह्मण नेमून वेदोक्तानुसार धर्मकर्मे सुरू केली. ते प्रकरण काही फारसे पेटले नाही. पण इकडे शाहू महाराजांनी वेदोक्ताचा आग्रह धरल्यावर मात्र जणू आभाळच कोसळले असे झाले. पुण्यात, कोल्हापुरात सनातन्यांचे जणू बंड माजले. 

आधी म्हटल्याप्रमाणे हा वणवा पेटला, तो एका उद्धट, बाहेरख्याली ब्राह्मणाच्या उर्मट उद्गारांनी. काय होते ते उद्रार, की जे ऎकून शाहूंसारखा राजर्षि कोपायमान झाला आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला चाबकाने फोडून काढले? 


संदर्भ -
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती 1986, पृ. 39 -52

2 comments:

  1. namaskar,

    tumacha blog mala khup avadato. itihasavishayi kutuhul ani godi laayache kam tumhi karat ahat. asech lihit raha. Pudhil at chalila manapasun shubbhechha

    Chakali
    चकली

    Reply
  2. नमस्कार विसोबा...!
    तुम्ही मि.पा.वरही असता ना? च्यायला श्टामीना जबरदस्त आहे तुमचा....! पण हे लष्कराच्या भाक-या भाजल्यासारखे वाटत नाही का?

    Reply

वाद वेदोक्ताचा (1)शिवछत्रपती शककर्ते, तरीही स‌नातन्यांच्या लेखी ते शूद्रच!



वाद वेदोक्ताचा (1)

शिवछत्रपती शककर्ते, तरीही स‌नातन्यांच्या लेखी ते शूद्रच! 

🛑 "शिवाजी क्षत्रिय नव्हताच. त्याने गागाभट्टाला लाच देऊन आपले क्षत्रियत्व मान्य करून घेतलं. त्याच्यामुळे शिवाजीच्या घराण्याचा स‌त्यानाश झाला."

कोल्हापूरचे शंकराचार्य ब्रह्मनाळकर स्वामी 
(इ.स. 1903 मध्ये शंकराचार्यांनी महाड मुक्कामी काढलेले उद्गार) (1)

"शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीने करून त्यांचा क्षत्रियकुलावतंस असा जयजयकार करणा-या गागाभट्टाला त्याच्या पातकाचं प्रायश्चित्त म्हणजे त्यास शौचकूपात पडून मृत्यू पत्करावा लागला."
- प्रोफेसर विष्णू गोविंद विजापूरकर, करवीर ब्रह्मवृंदाचे तत्कालिन नेते. (ग्रंथमाला मासिकातील वेदोक्तप्रकरणावरील लेखातील विचार.) (2) 

विसाव्या शतकाच्या प्रारंभी करवीर संस्थानात वेदोक्त प्रकरणावरून वातावरण किती विषारी झाले होते, हे या दोन वाक्यांवरून लक्षात यावे. महाराष्ट्राच्या पुढील स‌र्व स‌माजकारणावर मोठा परिणाम घडवून आणणा-या या प्रकरणात अटीतटीला आलेली, एकमेकांविरोधात उभी ठाकलेली माणसे कोणी सामान्य नव्हती. शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासारखे दिग्गज नेते तर या वादात एकमेकांविरोधात वाक्-शस्त्रे परजून होतेच, पण कोल्हापूर संस्थान व पुण्यातील ब्रह्मवृंदाची तसेच स‌त्यशोधक विचारसरणीची थोर नेतेमंडळीही त्यात होती. या प्रकरणाचा शेवट अखेर शाहू छत्रपतींच्या विजयाने झाला. विजय त्यांचा झाला, पण त्या संघर्षात महाराष्ट्रपुरुषाच्या काळजावर ज्या जखमा झाल्या त्या अजूनही पुरत्या भरलेल्या नाहीत. 

एका सामान्य, बाहेरख्याली भिक्षुकाच्या उर्मटपणातून सुरू झालेले हे प्रकरण. पण त्याची मुळं जातात ते थेट शिवकालापर्यंत, शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत की नाहीत या वादापर्यंत. गागाभट्टाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. पण त्याने तो वाद काही मिटला नाही. मराठी राजसत्ता लयास गेल्यावर अव्वल आंग्लाईत सातारच्या प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत स‌न 1832 मध्ये हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला गेला होता. प्रतापसिंह महाराजांनी सातारच्या वेदशालेत ब्राह्मण पक्ष आणि क्षत्रिय पक्षाची धर्मपरिषद घेतली. ब्राह्मण पक्षाला सांगलीच्या पटवर्धनांचा पाठिंबा होता. क्षत्रियांची बाजू आबा पारसनीस या कायस्थ प्रभू पंडिताने मांडली होती. त्या वादविवादात अखेर क्षत्रियांचाच विजय झाला व भोसले, घाटगे, जाधव, शिर्के इ. मराठा घराणी क्षत्रिय असल्याचे सिद्ध झाले. यानंतर असाच प्रसंग बडोद्यात घडला. ऑक्टो. 1896 मध्ये स‌याजीराव महाराजांना त्यांच्या पुरोहिताने सुनावले, की ते शूद्र आहेत व वेदोक्ताचा अधिकार त्यांना नाही. (3)

येथे ही वेदोक्ताच्या अधिकाराची भानगड स‌मजून घेतली पाहिजे. 

वेद हे आपल्या महान हिंदुधर्माचे आधारस्तंभ आहेत. ती ईश्वरी वाणी आहे. आपल्या थोरथोर ऋषिमुनींच्या नावे वेदांतील ऋचा येतात. पण ते काही त्या ऋचांचे रचनाकार नसतात. त्यांना त्या ऋचा दिसलेल्या असतात. तेव्हा ती दैवीवाणीच. आणि म्हणून ती ऎकण्याची, म्हणण्याची मुभा फक्त द्विजांना. 

हे द्विज म्हणजे काय, तर ज्यांचा दुसरा जन्म झाला आहे असे. दुसरा जन्म केव्हा होतो, तर मौंजीबंधनानंतर. हा मुंज करण्याचा अधिकार कोणाला तर फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना. म्हणून हे तीन वर्ण झाले द्विज. उरलेल्या शूद्रांना वेदश्रवणाचाही अधिकार नाही. कारण शूद्र जातीतील व्यक्ती हे हिंडते फिरते स्मशान असल्याने त्याच्याजवळ बसून वेदाध्ययन करण्यासही मनाई. शूद्र वेदश्रवण करू लागला तर त्याच्या कानात शिसे व लाख ही पातळ करून ओतावी, अशी शिक्षा तर स्मृतींनीच सांगितलेली. (4) हे प्रकरण एवढे कडक, की शंबूक नावाचा शूद्र वेदाध्ययन करत होता व त्याच्या या पापाचरणामुळे रामराज्यातील ब्राह्मणाचा पूत्र अकाली मरण पावला, हे स‌मजल्यानंतर स्वतः प्रभू रामचंद्राने त्या शंबुकाचे मस्तक धडावेगळे केले. रावणवधाइतकाच हा शंबूकवधही महत्त्वाचा! 

बरे ही झाली खूप पूर्वीची गोष्ट. तेव्हा क्षत्रिय, वैश्य यांनाही वेदश्रवणाचा अधिकार होता. पण पुढे नंद घराण्याचा अंत झाला आणि त्याबरोबर समस्त पृथ्वीवरील क्षत्रियकुल संपले. आपल्या पवित्र पुराणांनी ही गोष्ट उच्चरवाने सांगितली आहे, की कलियुगात वैश्यांसह क्षत्रियांचा अभाव असेल. (5) 

आता कलियुगात क्षत्रिय, वैश्य नाहीत, असा जाहीरनामा पुराणे व व्रात्यनिर्णय यांसारख्या ग्रंथांनी काढल्यामुळे शिवछत्रपतींनाही स‌नातनी भटभिक्षुक शूद्च स‌मजत असत. फार काय खुद्द गागाभट्टही शिवाजी महाराजांना शूद्रच स‌मजत होते... (क्रमशः)


संदर्भ -
1. राजर्षि विशेषांक (रविवार दिनांक), पृ. 10
2. उक्त, पृ. 11
3. उक्त, पृ. 9
4. शाहू छत्रपती आणि लोकमान्य, पृ. 42-43
5. उक्त, पृ. 42

- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, 1986
- वेदोक्त प्रकरण - ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा खडा स‌ंघर्ष - डॉ. जयसिंगराव पवार, राजर्षि - राज्यारोहण शताब्दी विशेषांक, रविवार दिनांक, 3 एप्रिल 1994.

9 comments:

  1. रा.रा. विसोबा शेठ.


    या विषयावर अजून वाचायला आवडेल!
    जरा विस्तृत भाग टाकावेत.

    Reply
  2. Visoba Sir...Thodishi off the topic comment...Tumhi.Dhang-Ting walech na..?..I am really Big Fan of your writing..Hats off 2 u!!!

    Reply
  3. Ajun liha buwa patkan

    Reply
  4. पटपट पटपट लिखाण व्हावे
    वाट पहावया आम्हा न लावावे ;)

    Reply
  5. Sir, tumhi Sanyukta Maharashtra chalvalibaddal kahi lihal ka?
    karan aamchya pidhila kahich kalpana nahi tyabddal...

    Reply
  6. ra. ra. aajanukarn, anand & suhas-nidhi,
    tumche mhanane shirsavandya!
    -------
    ra. ra. Abhi,
    nakki lihu ya. tyat hi baryach gamati jamati aahet. udaharnarth, sanyukta maharashtra samitichya sarv tharavanchi bhasha english hoti!!
    -------
    & ra. ra. prasad,
    amhi kon mhanuni kay pusata
    amhi asu ladake.... tumche!!
    --------

    Reply
  7. त्यांना त्या ऋचा दिसलेल्या असतात. तेव्हा ती दैवीवाणीच. आणि म्हणून ती ऎकण्याची, म्हणण्याची मुभा फक्त द्विजांना. 
    ___________
    Yajurved 18.48:
    O Lord! Provide enlightenment/ compassion to our Brahmins, Kshatriyas, Vaishyas and Shudras. Provide me also with the same enlightenment so that I can see the truth.
    Yajurved 26.2:
    The way I gave this knowledge of Vedas for benefit of all humans, similarly you all also propagate the same for benefit of Brahmins, Kshatriyas, Shudras, Vaishyas, Women and even most downtrodden. The scholars and the wealthy people should ensure that they not deviate from this message of mine.

    Reply
  8. zala ka samadhan vissh okun ? :D
    ata bhagh Satya 
    vaacha agyaani lokano ani sudhara 

    http://agniveer.com/821/vedas-and-shudra/

    Reply
  9. गागाभट्ट शिवरायांना शुद्र समजत होते, ? अत्यंच चुकिचे वाक्य.

    Reply

येशू ख्रिस्ताचे धर्मशिक्षण हिंदुस्थानात झाले होते?


येशू ख्रिस्ताचे धर्मशिक्षण हिंदुस्थानात झाले होते?


येशू ख्रिस्ताचा जन्म फिलीस्तीनमधील नाझरेथ या शहरात झाला. त्याच्या जन्मसालाची एक गंमतच आहे. म्हणजे असे मानले जाते, की ख्रिस्ती स‌न सुरू होण्यापूर्वी दोन-तीन वर्षे आधी (2-3 बी.सी.) त्याचा जन्म झाला! या काळात फिलीस्तीनवर रोमन स‌म्राट सीझरची सार्वभौम स‌त्ता होती आणि तेथे हेरोद राजा रोमन स‌म्राटाचा मांडलिक म्हणून राज्य करीत होता. 

येशू लहानपणापासूनच धार्मिक प्रवृत्तीचा असल्याचे उल्लेख शुभवार्तेत येतात. जॉन द बाप्टिस्ट हा त्याचा मावसभाऊ. त्याच्याकडूनच येशूने पुढे दीक्षा घेतली. त्यानंतर येशू तडक पहाडात गेला. चाळीस दिवस तेथे त्याने तप केले. त्यातून तावून-सुलाखून निघून तो खाली उतरला आणि मग कौफरनाम या ग्यालीली प्रांतातील शहरात आला. तेथे त्याने आपले पहिले प्रवचन दिले. त्यावेळी तो 26-27 वर्षांचा होता. बायबलमध्ये ही माहिती येते. 

येथे बायबल म्हणजे नेमके काय हे पाहायला हवे. बायबल या शब्दाचे मूळ ग्रीक बिब्लियन (biblion) असे आहे. त्याचा अर्थ ग्रंथ. बायबलचे दोन भाग आहेत. एक जुना टेस्टामेन्ट आणि दुसरा नवा टेस्टामेन्ट. टेस्टामेन्ट म्हणजे साक्षपुरावा. जुना टेस्टामेन्ट हा ज्यूंचा धर्मग्रंथ आहे. त्यात त्यांचे धर्मशास्त्र, प्रेषित आणि ग्रंथ यांची माहिती आहे. नव्या टेस्टामेन्टमध्ये येशूचे चरित्र आहे. त्याचे 27 भाग आहेत. पहिल्या चार भागांना इंग्रजीत गॉस्पेल (शुभवार्ता) म्हणतात. त्यात येशूचे जीवन सांगितले आहे. हे चार भाग असे - म्याथ्यूची शुभवार्ता, मार्कची शुभवार्ता, ल्यूकची शुभवार्ता आणि जॉनची शुभवार्ता. यातील म्याथ्यू हा येशूच्या प्रत्यक्ष संबंधात आला होता असे म्हणतात. मात्र इतिहासकारांच्या मते म्याथ्यूची शुभवार्ता ख्रिस्तानंतर 70च्या पुढे लिहिली गेली असावी, असे म्हणतात. एकंदर हे चारही शुभवार्ताकार भक्त-संत येशूच्या नंतर 60 ते 100 वर्षांच्या काळात झालेले आहेत. त्यांनी येशूचे शिष्य वा अनुशिष्य यांच्या तोंडून ऎकलेल्या कथा आपापल्या शुभवार्तेत सांगितल्या. हा स‌र्व भाग मुळात ग्रीकमध्ये आहे. आजचे इंग्रजी बायबल हे इंग्लंडच्या पहिल्या जेम्स राजाने इ. स. 1611 मध्ये करून घेतलेले भाषांतर आहे. तेच अधिकृत म्हणून प्रचलित आहे. 

तर या शुभवार्तांमध्ये येशूचे बालपण ते मृत्यू व त्याचे पुन्हा जिवंत होणे वगैरे हकिकती येतात. असे असले, तरी रशियन संशोधक निकोलाय नातोविच यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या बाराव्या वर्षापासून तिशीपर्यंत येशू कोठे होता याचा खुलासा काही होत नाही. एवढेच नव्हे तर मृत्युनंतर तिस-या दिवशी येशू पुन्हा जिवंत झाला. पण त्यानंतर काय? त्यानंतर त्याचे काय झाले? तो कोठे गेला? या प्रश्नांची उत्तरेही सापडत नाहीत. नातोविच यांनी इ. स. 1890मध्ये 'द अननोन लाइफ ऑफ जीजस ख्राईस्ट' हे पुस्तक लिहिले. त्यावर पोपने तत्काळ बंदी घातली. तर या पुस्तकानुसार "तिस-या शतकापर्यंतच्या ऎतिहासिक नोंदींमध्ये येशूचा उल्लेखच येत नाही. येशूला सुळावर दिल्यानंतर सुमारे 80 वर्षांनंतर रोमन इतिहासकारांनी आपल्या बखरींत ख्रिश्चन सेक्टचा उल्लेख केलेला आहे. पण त्यात जीजस ख्राईस्ट या व्यक्तीचा नामोल्लेख नाही. इ. स. 98 मध्ये जोसेफ फ्लेव्हियस या ज्यू इतिहासकाराने 'ज्युईश अँटिक्विटीज' नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यात तत्कालिन ज्ञात इतिहास शक्य त्या विस्ताराने दिला आहे. नीरो या रोमन स‌म्राटाच्या कारकीर्दीचे वर्णन त्यात आहे. जॉन द बाप्टिस्ट, हेरोद (अँटिपस) आणि (रोमच्या बादशहाचा प्रतिनिधी पाँटिअस) पायलेट यांचे वर्णन आहे. तत्कालिन स‌माजजीवनाचेही वर्णन आहे. पण त्यात जीजस किंवा इसाचे नाव येत नाही. येशूने केलेल चमत्कार व येशू पुन्हा जिवंत झाला याचा निर्वाळा रोमन इतिहासकार जोसेफस याने दिला, असा उल्लेख प्रथम तिस-या शतकात एका रोमन इतिहासकाराने केला आहे."

नातोविच विचारतात, या अनुल्लेखामागचे रहस्य काय? वयाच्या बाराव्या वर्षापासून तिशीपर्यंत इसा कोठे होता? या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी ते 1867मध्ये काश्मीरमध्ये आले. तेथून ते लेहला गेले व हेमिस या बुद्धमठात असलेली हस्तलिखिते त्यांनी मिळविली. त्या हस्तलिखितांमध्ये काय लिहिलेले होते? 

इस्त्रायलमध्ये जन्माला आलेला इसा हा यशोदा पुत्र कृष्ण या हिंदू अवतारमालिकेतील नवा अवतार असून, तो बुद्धानंतरचा युरोपातील अवलोकितेश्वर म्हणून ओळखला जाईल, अशी भाकिते त्या जुन्या पोथ्यांमध्ये होती!!

नंतर 19व्या शतकात लेव्ही डाऊलिंग यांचे 'The Aquarion Gospel' नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी नातोविच यांच्या 'संशोधना'स पुष्टीच दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या बारा ते एकोणिस वर्षांपर्यंत येशू हिंदुस्थानात होता! 

या पुस्तकात डाऊलिंग यांनी म्हटले आहे, की "ओरिसाच्या एका राजपुत्राने एका देवळात बारा वर्षांच्या मुलास पाहिले. तो बुद्धिवान आहे असे दिसले व त्यास घरी आणून शिक्षण दिले. जगन्नाथाच्या भव्य देवालयात त्याला विद्यार्थी म्हणून स्वीकृत करण्यात आले. वेदांचा व मनूच्या धर्मशास्त्राचा प्राथमिक अभ्यास करण्याची संधी त्याला येथे मिळाली. येथे गुरुजनांशी वाद करताना त्याने बुद्धिवाद केल्यामुळे त्याला ब्राह्मणवर्गाचा रोषही पत्करावा लागला."

यात कितपत तथ्य आहे? माहित नाही. 
पण येशूचे हिंदुत्व सांगण्यासाठी या पुस्तकांचा वापर करण्यात येतो. 
हा लेखही ज्या लेखावरून बेतला त्याचे नाव आहे 'येशूच्या हिंदुत्वाचा एक आगळा शोध' व तो प्रसिद्ध झाला होता 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये! 

एकूण गंमत आहे, इतकेच! 


संदर्भ -

- येशूच्या हिंदुत्वाचा एक आगळा शोध ! - वसंत गडकर, दै. सामना, 25 डिसेंबर 1994.
- मानवाचा पुत्र येशू - भाऊ धर्माधिकारी, ग्रंथाली प्रकाशन, पहिली आवृत्ती, 1983. 
येशू काश्मीरमध्ये आला होता?

4 comments:

  1. very interesting....!

    Reply
  2. ख्रिस्ताच्या आयुष्यातील काही वर्षांबद्दल गूढ आहे हे बरोबर. पण ख्रिस्ताच्या धर्मशिकवणुकीवर हिंदु धर्माच्या तत्वद्न्यानाचा वा शिकवणुकीचा काही प्रभाव दिसतो काय? करूणा या त्याच्या शिकवणुकीच्या मूलाधाराशी हिंदु धर्माचा काही संबंध नाही! कदाचित त्याने भारतात काही काळ काढला असला व हिंदु, बौद्ध वा जैन तत्वद्न्यानाशी त्याची ओळख झाली असली तरी त्याची शिकवण स्वतंत्र आहे. ज्यू धर्मात शिरलेल्या अनिष्ट गोष्टींवरील प्रतिक्रिया हे त्याचे मूळ आहे असे म्हटले जाते.

    Reply
  3. mala ka kon jane yachyat tathya vatat nahi karan mulat bhasha hi vegvegali hoti... tya mule hindu dharmache path aani ekunach mala kalpanik vatat ... 
    tumhala hi farakat nahi janavali ka akadhi?

    Reply
  4. Your Blog Is very Nice and Usefull Please Continue your blog

    Reply

टिळक-आगरकरांची वृत्तपत्रीय परंपरा - दुसरी बाजू


टिळक-आगरकरांची वृत्तपत्रीय परंपरा - दुसरी बाजू


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी "केसरी-मराठा'तून, तसेच नंतर आगरकरांनी स्वतंत्रपणे "सुधारक'मधून केलेली पत्रकारिता हा आजही आदर्श मानली जाते. ती आदर्श आहेच, यात शंकाच नाही. मात्र त्यांची पत्रकारिताही निष्कलंक नव्हती! रा. के. लेले यांनी आपल्या इतिहासग्रंथात हे स्पष्टपणे नोंदविण्याचे धैर्य दाखविले आहे. 

त्यांच्या पुस्तकातील हा उतारा टिळक-आगरकरांच्या पत्रकारितेची दुसरी बाजू लख्ख प्रकाशात आणतो. - 
""1893 च्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत हिंद-मुसलमानांचा भयंकर दंगा झाला. हिंदुंनी चालविलेल्या गोरक्षणासारख्या चळवळीमुळे दोन्ही जमातींत वैमनस्य निर्माण होते व त्याची परिणती जातीय दंगलीत होते, असे मत ऍक्‍स्वर्थ व व्हिन्सेंट यांच्यासारखे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी व "टाइम्स ऑफ इंडिया' सारखे अँग्लो-इंडियन वर्तमानपत्र सतत मांडीत होते.... अशा स्थितीत "आपले मत काय आहे ते स्पष्टपणे सरकारला वेळीच कळविले पाहिजे' असे वाटल्यामुळे टिळक व माधवराव नामजोशी यांनी पुढाकार घेऊन 10 सप्टेंबर 1893 रोजी शनिवारवाड्यापुढे हिंदूंची एक जंगी सभा भरवली. ही सभा भरवू नये म्हणून न्या. मू. रानडे यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले. त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी साथ दिली. आगरकरांनी टिळकांविरुद्ध रानडे-गोखल्यांची बाजू उचलून धरली. पण टिळकांनी विरोध बाजूला सारून सभा भरविलीच. सभा झाल्यानंतर "ज्ञानप्रकाश' पत्राने 14 सप्टेंबरच्या अंकात "तीन खोट्या गोष्टी' लिहिल्या. त्यातून वाद पेटला.

18 सप्टेंबरच्या "सुधारका'च्या अंकात आगरकर वादात उतरले. "हिंदूंच्या जंगी सभेने कोणता दिग्विजय लावला?' या मथळ्याचे संपादकीय लिहून आगरकरांनी टिळकांवर हल्ला चढवला. "ज्यांच्या मेंदूस धनुर्वात किंवा अर्धांगवायू झाला नाही; ज्यांचे भाषण, लेखन व आचरण पाहिले असता विधात्याने सर्व शहाणपण एकत्र करून त्याचे हे मूर्तिमंत पुतळे ओतले आहेत की काय, असा भास होतो; ज्यांचा शब्ददुंदुभी वाजू लागला की सारा समाज ते सांगतील तसे नाचण्यास सज्ज होतो; सारांश, ज्यांना या महाराष्ट्रभूमीचे अनभिषिक्त राजे म्हणण्यास हरकत नाही त्यांनी स्वल्प अडचण दिसल्याबरोबर ग्रामसिंहाप्रमाणे शेपटी खाली घालावी, आपल्या शीलास अगदी उलट वर्तन करावे ही केवढी शरमेची गोष्ट आहे बरे! ज्यांचा संसर्ग लोकास महारोग्याच्या संसर्गाप्रमाणे वाटू लागला आहे त्यांनी त्याशी फिरून सलगी व जे जात्या खुनशी, घमेंडखोर व अत्यंत नीच आहेत, त्यांनी वंद्य सज्जनावर निष्कारण तुटून पडण्याचा व त्यावर भलतेच आरोप आणण्याचा अधमपणाचा प्रयत्न करू नये तर केव्हा करावा?' अशा प्रकारची टीका व विशेषतः आगरकरांनी केलेला अपशब्दांचा वर्षाव यामुळे टिळक अगदी प्रक्षुब्ध होऊन गेले. त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या सर्वांचा सणसणीत समाचार घेतला. 

"अधीर तरतरीचे व अविचारी अतएव परप्रत्ययनेय बुद्धीचे तरुण सेक्रेटरी,' असा टोला गोखल्यांना टिळकांनी मारला. पण आगरकरांवर मात्र ते तुटून पडले, त्यांनी लिहिले, "स्वतः करवत नाही व दुसऱ्याने केलेले पाहवत नाही अशा मनुष्यास गवताच्या गंजीवरील कुत्र्याची उपमा देत असतात. चतुःशृंगीच्या मैदानावरील गंजी जळल्यामुळे अगर दुसऱ्या काही कारणामुळे आमच्या येथील अशा प्रकारचा एक गंजीवरील कुत्रा अगदी पिसाळला आहे व ज्याच्या त्याच्यावर तोंड टाकण्याखेरीज त्यास दुसरा मार्ग काहीच दिसत नाही. सभेचे हेतू, उद्देश आणि ठराव हे या लेखकास मान्य आहेत, असे त्याच्या पहिल्या लेकावरून सिद्ध होते, मग आमच्या सभेच्या चालकास व्यर्थ शिव्या देण्याचा हेतू एम. ए. झालेल्या मनुष्याचा मेंदू किती सडका असतो हे दाखविण्यापेक्षा दुसरा काही एक नव्हता, असे म्हणावे लागते... सुधारकांच्या अग्रणीचे राजकीय बाबतीत अनुकरण न केले तर आमच्यावर मोठा प्रसंग गुजरेल असे गावाबाहेर महारोग्याप्रमाणे राहणाऱ्या या सुधारकाच्या पितमाह एडिटरास वाटत आहे... सभेचे उद्देश व ठराव काय आहेत याची पूर्ण माहिती झाली असताही पुन्हा खोट्यानाट्या गोष्टी लिहून आपल्या व्यवसायबंधूबद्दल सरकारचे मन कलुषित करणे यापेक्षा जास्त नीचतेचा किंवा अधमपणाचा प्रकार मनुष्य अशी संज्ञा धारण करणाऱ्याकडून घडेल असे आम्हा वाटत नाही... गवताच्या गंजीजवळ राहून हे राजेश्री गवत खात नाहीत हे भर्तुहरी म्हणतात त्याप्रमाणे पशूंचे भाग्य समजावयाचे!' (केसरी, 19 सप्टेंबर 1893) 

टिळक आगरकर यांची आणखी एका प्रसंगाने अशीच झटापट होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत जाण्याचा प्रसंग आला होता.... ''

हे प्रसंग सांगून लेले लिहितात, ""टिळक व आगरकर यांच्यामधील वाग्‌युद्धाचा हा इतिहास उद्वेगजनक आहे. समाजसेवेचे कंकण बांधून पत्रव्यवसाय करणाऱ्या या दोन थोर संपादकांनी एकदा वादाला तोंड फुटल्यावर तारतम्य न ठेवता एकमेकांवर हवी तशी चिखलफेक केली.... टिळक-आगरकरांतील वाद आता ऐतिहासिक बाब झाली असली तरी वैयक्तिक टीकेची अनिष्ट परंपरा पुष्ट करण्यास या दोघा मातबर संपादकांनी हातभार लावला ही गोष्ट नाकारता येणार नाही.''

"केसरी' व "सुधारक' या दोन्ही पत्रांमधील अशा मजकूरामुळे त्यांच्यावर तत्कालीन वाचकांनी, अन्य संपादकांनी टीका केली होती. "अरुणोदय' या पत्राने आधी एका प्रसंगी टीका केली होती, ती अशी - 
दोघेही "विचारशून्य, ज्ञानशून्य व हलकट' ""... मंगळवारची सिंव्हगर्जना ऐकावी अशी उत्सुकता होऊन व सिंव्ह हा राजा असल्यामुळे आपल्या थोर स्वभावावर जाईल असे वाटले होते पण तोही बिचारा विकारवशतेच्या पिंजऱ्यात सापडून कोल्ह्यासारखी कोल्हेकुई करू लागला हे वाचल्याबरोबर मात्र अतिशय वाईट वाटले.... गेल्या सुधारकात तुळशीबागेतील 5000 लोकांस "विचारशून्य', "ज्ञानशून्य' व "हलकट' असे म्हणण्यात आले आहे व गेल्या केसरीत राव. ब. रानडे प्रभृती मंडळीस अशा प्रकारच्या पण किंचित सभ्य अशा शिव्या देण्यात आल्या आहेत.'' (अरूणोदय, 2 नोवहेंबर 1890)

यावर वेगळी मल्लीनाथी करण्याची काही आवश्‍यकता आहे काय? पुढे अनेक पत्रांनी टिळक-आगरकरांचा हा वारसा नेटाने चालविला!

संदर्भ - 
वृत्तपत्रांचा इतिहास - रा. के. लेले, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रथमावृत्ती 1984, पृ. 331 ते 334.

5 comments:

  1. this is a Hatake site...also gives good and rare info of history...

    Reply
  2. Namaskar. Blog Aavadala. Dhanyawad Aaplya Lekhanbaddal.

    Reply
  3. Hi,

    We have shortlisted this article for Netbhet eMagazine Nov 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.
    Please provide your full name and email id.
    Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary - 09819128167 for more information.

    Regards,
    Sonali Thorat
    www.netbhet.com

    Reply
  4. टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.

    Reply
  5. खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली असेल. 

    नमस्कार , 
    '१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे. 
    गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे. 
    माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे. 
    Telegram Channel name : @visionump 
    Youyube channel name : VISION UPSC MPSC PO

    प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

    मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

    मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

    आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

    आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

    आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

    तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

    Reply

तुकारामांची गुरूपरंपरा सुफी मुस्लिम?


तुकारामांची गुरूपरंपरा सुफी मुस्लिम?

क्या गाऊं कोई सुननवाला । देखें तों स‌ब जग ही भुला ।।1।।
खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ।।धृ.।।
काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऎसी लोक बिराणी ।।2।।
गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ।।3।।
(तुकाराम गाथा - देहू प्रत, पृ. 260, अभंग 1146)

मराठी सारस्वताला ललामभूत अशा तुकोबारायांचे असे काही हिंदी अभंग पाहिले, की नाही म्हटले तरी आश्चर्य वाटतेच! तुकोबांनी हे हिंदी अभंग का आणि कुणासाठी रचले असावेत असा एक प्रश्न स‌हजच मनात येतो. तुकोबांचे गाव देहू. त्यांच्या काळात तो विजापूरच्या आदिलशाहीचा भाग होता. तुकोबांचे घराणे महाजनांचे. तेव्हा आदिलशाहीतील अधिका-यांशी त्यांचे या ना त्या कारणाने संबंध येतच असणार. मुद्दा असा की ही दखनी बोली काही त्यांना परकी नव्हती. कदाचित त्यांनी अगदी स‌हजच त्या बोलीत काही पदं रचली असतील. हा आपला एक अंदाज. 

पण जेव्हा तुकोबांच्या गुरूपरंपरेचे नाते मुस्लिम सुफी संप्रदायाशी असल्याचे सांगितले जाते, तेव्हा मग वाटते, की तुकोबांच्या दखनी काव्यात आश्चर्य करावे असे काहीच नाही.

पण आता अविश्वसनिय वाटावी अशी वेगळीच गोष्ट स‌मोर येते. तुकोबांच्या गुरुपरंपरेचे नाते सुफी या मुस्लिम संप्रदायाशी? 
हे म्हणजे काहीच्या काही होतेय! 
तुकोबांचे गुरु तर बाबाजी चैतन्य. त्यांच्या अभंगाचीच तशी साक्ष आहे.
ते म्हणतात - 

सद्गुरुरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा काहीं ।।
सांपडविले वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ।।धृ।।
भोजना माहती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ।।2।।
कांही कळहे उपजला अंतराय । ह्मणोनियां काय त्वरा जाली ।।3।।
राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खुण माळिकेची ।।4।।
बाबाजी आपलें सांगितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ।।5।।
माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका ह्णणे ।।6।।
(तुकाराम गाथा - देहू प्रत, पृ. 80, अभंग 368)

पण तरीही तुकारामांची गुरुपरंपरा सुफी असल्याचेही एक मत मांडले जाते. एवढेच नव्हे, तर त्यांच्या नाहीसे होण्याबद्दल बोलताना, त्यांनी आपल्या सुफी गुरुपरंपरेनुसार जीवंत स‌माधी घेतली असावी असाही एक तर्क मांडला जातो. 

वरील अभंगावरून असे दिसते, की राघवचैतन्य, केशवचैतन्य आणि बाबाजीचैतन्य अशी तुकोबांची गुरुपरंपरा आहे. म्हणजे राघवचैतन्य हे तुकोबांचे आजेगुरू, कैशवचैतन्य हे त्यांचे शिष्य आणि बाबाजी दीक्षित हे त्यांचे शिष्य अशी ही मालिका आहे. रा. रा. भालचंद्र नेमाडे यांनी तुकाराम गाथेतील निवडक अभंगांचे संपादन केले आहे. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी ही मालिका नोंदली आहे. पण श्री निरंजन स्वामीकृत 'चैतन्य विजय' हा ग्रंथ काही वेगळीच माहिती देतो. श्री निरंजन स्वामी तथा ह. भ. प. निरंजनबाबा नाशिककर यांचा हा ग्रंथ शके 1709चा. (इ. स. 1788) हा ग्रंथ बाबाजीचैतन्य आणि केशवचैतन्य हे एकच असल्याचे सांगतो. (स‌र्वजन म्हणती केशव चैतन्य । भाविक म्हणती बाबाचैतन्य । दोन्ही नामें एकची जाण । अत्यादरें बोलती ।। - अध्याय 3, ओवी 114) या ग्रंथाच्या प्रास्ताविकात अनंत श्रीधर भवाळकर ऊर्फ चैतन्यदास यांनी हेच मत दिले आहे. ते म्हणतात, "(तुकारामांच्या) अभंगात मालिकेची हा शब्द आहे. ही मालिका त्रयीची असते. राघवचैतन्य हे आपले गुरु श्रीमत् व्यास यांची परंपरा सांगतात व त्यांचे शिष्य केशवचैतन्य होत. त्यादृष्टीने ही त्रयीची मालिका बरोबर जुळते. इतिहाससंशोधक या मालिकेच्या संबंधात मुग्ध आहेत." (या ठिकाणी चैतन्यदास यांचा रोख वा. सी. बेंद्रे यांच्याकडे असावा. त्यांनी तुकोबांचे चरित्र लिहिले असून, तुकारामांच्या गुरुपरंपरेचा इतिहासही कथन केला आहे.) गंमत म्हणजे याच ग्रंथातील 37 व्या पानावरील एका तळटीपेत राघव, केशव व बाबाजी चैतन्य हे वेगळे असल्याचे नमूद केले आहे! तर ते असो. 

मुद्दा असा, की जर तुकारामच बाबाजीचैतन्य हे आपले गुरू असल्याचे सांगत असतील व राघवचैतन्य हे त्यांचे परात्पर गुरु असतील, तर मग ही सुफी परंपरा कोठून आली?

हे पाहण्यापूर्वी राघवचैतन्य व केशवचैतन्य यांचे चरित्र जाणून घ्यावे लागेल. राघवचैतन्य हे तंत्रमार्गी होते. त्यांनी महागणपती आणि ज्वालामुखी देवी यांची तांत्रिक स्तोत्रे रचली आहेत. त्यांचा काळ इ. स. 1500 च्या सुमाराचा. 'चैतन्य विजय'नुसार त्यांची वस्ती काही काळ ओतूर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे मांडवी-पुष्पावतीच्या तीरी होती. तेथे ते गुप्तपणे राहात होते. तेथेच त्यांना विश्वनाथबाबा हा ब्राह्मण गृहस्थ भेटला. यांचा जन्म पुणें वाडीचा. त्याच्यावर राघवचैतन्य यांनी अनुग्रह केला व त्याचे नाव केशवचैतन्य असे ठेवले. त्यांनी उत्तरखंडातील स‌र्व तीर्थांची यात्रा केली व बारा वर्षांनी ते कर्नाटकातील गुलबर्ग्यास आले. तेथून जवळच, 16 मैल अंतरावर असलेल्या आळंद (आळंद-गुंजोटी) येथे त्यांनी बराच काळ निवास केला. तेथेच आनंदीदेवीच्या मंदिरात राघवचैतन्य यांनी महासमाधी घेतली. 'चैतन्य विजय'नुसार कलबुरगे येथे राघवचैतन्य यांनी मशीद उडविण्याचा चमत्कार केला. तो पाहून निजामशहा बादशहा अचंबित झाला व राघवचैतन्य यांची भक्ती करू लागला. त्याच्या आग्रहावरून राघवचैतन्य हे आळंद गुंजोटी येथे राहिले व तेथेच त्यांनी स‌माधी घेतली आणि आपले शिष्य केशवचैतन्य यांना त्यांनी ओतूरला पाठवून दिले. तर ही स‌माधी राघवदराज म्हणून ओळखली जाते. चैतन्यविजय सांगतो, की हे नाव यवनांनी ठेविले. ब्राह्मणांनी मात्र त्यांना राघवचैतन्य असेच म्हणावे. या स‌माधीच्या "एकभागी पूजा करिती ब्राह्मण । एकभागी पूजा करिती यवन । अद्यापि तेथील महिमान । चालले असे यापरी ।। " (अध्याय 3, ओवी 96) 

तर ही राघवचैतन्यांची स‌माधी लाडले मशायख या नावाने ओळखली जाते. आणि त्यांचे शिष्य केशवचैतन्य हे गेसू दराज बंदेनवाज व बाबाजीचैतन्य शेखसाहेब या नावाने ओळखले जातात. (चैतन्यविजय, पा. 37)

ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मते मुळात राघवचैतन्य यांचे चरित्रांतर नंतर झालेले आहे. "त्यांनी स‌माधी घेतल्यानंतर लौकरच, सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुसलमान आक्रमकांनी या स्थानाचा (म्हणजे आळंदचा) कब्जा मिळविला, इथली मंदिरे उद्ध्वस्त केली, राघवचैतन्यांच्या स‌माधीचे रूपांतर एका काल्पनिक सूफी अवलियाच्या स्मारकात केले, त्या काल्पनिक स‌ूफी अवलियाचे चरित्र लाडले मशायख या नावाने रचले," असे रा. रा. बेंद्रे यांचे प्रतिपादन आहे.

गेसू दराज आणि शेखसाहेब ऊर्फ ख्वाजा शेखसाहेब यांच्याबद्दल एक वेगळी माहिती मिळते. "दक्षिणेत बहमनी राज्य स्थापन झाल्यानंतर निजामुद्दीन अवलिया यांच्या आज्ञेने सातशे सूफी दरवेशी दिल्लीहून धर्मप्रचारार्थ निघाले होते. त्यात ख्वाजा शेख, बंदेनवाज, सैयद मीर गेसू दराज हे प्रमुख होते. ते बहमनी सुलतानाची राजधानी गुलबर्गा येथे स्थायिक झाले. (स‌ैयद मीर गेसू दराज हे) बहामनी सुलतानाचे राजगुरू होते... त्यांचा मृत्यू गुलबर्ग्यात इ. स. 1422 मध्ये झाला." (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 29) 

परंतु येथे महत्त्वाची ठरते ती एकच गोष्ट की, तुकारामांवर गुरुकृपा होण्यापूर्वीपासून कित्येक वर्षे आधी राघवचैतन्य यांचे चरित्र लाडले मशायख ऊर्फ शेख अलाउद्दीन अन्सारी लाडले या नावाने रचले गेलेले आहे. 

---------------------------------------------------

येथे एका गोष्टीचा उल्लेख करावयास पाहिजे, की सूफी साधू आणि हिंदू संत-सज्जन यांचे संबंध त्याकाळी अतिशय स‌लोख्याचे असल्याचे दाखले आहेत. उदाहरणार्थ जनार्दनस्वामी (1426, चाळीसगाव) यांना चांद बोधले या सूफी मलंगाने अनुग्रह केला होता, तर स्याहगढच्या सूफी साधुला मौला दत्त असे नाव आहे. (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 38) फार काय, शेख लतीफ, शेख मुहम्मद यांना वारकरी संप्रदायात मानाचे स्थान आहेच, पण सोळाव्या शतकात बहमनी राजघराण्यातील मुन्तोजी बहमनी या सुलतानाचे नावही वारकरी संतांच्या सूचीत आढळते. (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 40) 

महानुभाव पंथाशीही सूफी संप्रदायाचे निकटचे संबंध होते. महानुभाव साधू मुस्लिम पिरांप्रमाणे काळी वस्त्रे परिधान करीत व स्वतःला स्याह फकीर म्हणवत असत. आपल्या श्री दत्त या आराध्य दैवताचे वर्णन मुस्लिम पद्धतीने करीत असत. (स्याहगड से मौला दत्त डुले वगैरे) (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 42)

पुढे ज्ञानोबांनी गीतेवरील टीका लिहून वैदिक धर्ममतास बळ दिले. त्यामुळे सूफी वा अन्य कोणतेही अवैदिक संप्रदाय वा पंथ महाराष्ट्रात फारसे रूजू शकले नाहीत. परंतु स‌माजजीवनावरील धर्मपंथ-संप्रदायांची असणारी छाप काही अशीच विरून जात नसते. 

--------------------------------------------------------------

तुकोबांचे परात्परगुरू जन्माने सूफी मुस्लिम होते की काय, हे खरे तर महत्त्वाचे नसतेच. त्यांचे एक चरित्र सूफी अवलियाचे आहे आणि त्यांच्या भक्तगणांत हिंदूंप्रमाणेच मुस्लिमही आहेत, ही गोष्ट महत्त्वाची! 


संदर्भ -
- चैतन्य विजय - प्रकाशक - सुधाकर राजर्षि, ओतूर, आवृत्ती दुसरी, 1982.
- जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथा - प्रकाशक विठोबा रखुमाई देवस्थान संस्थान, देहू, दुसरी आवृत्ती, जाने. 2001.
- तुकाराम गाथा (निवडक अभंग) - संपादक - भालचंद्र नेमाडे, प्रकाशक - साहित्य अकादमी, पहिली आवृत्ती 2004. 
- शिरडीचे श्री साईबाबा व सूफी पंथ - संपादक - डॉ. गुरूनाथ व्यंकटेश दिवेकर, शलाका प्रकाशन, मुंबई, प्रथमावृत्ती जुलै 1993

16 comments:

  1. विसोबा काका...
    मागची पोस्ट आणि या पोस्ट फक्त वाचुन काढाव्या लागल्या... घेण्यासारखे खास काही नव्हते हो...

    काहिशी माहीती मिळाली पण उत्साहाने वाचावी आणि दुस~यांनाही सांगावी अशी नाही हो.. [;)]

    Reply
  2. ra. ra. ananda, bhavna pochali! kalji ghein..

    Reply
  3. मित्रांनो, 
    रा. रा. पी. के. फडणीस हे आपल्या ब्लॉगविश्वातले ज्येष्ठ स‌ोबती. त्यांचा http://pkphadnis.blogspot.com/
    हा ब्लॉग जरूर वाचावा असा आहे. 
    स‌ोमनाथ मंदिराविषयी त्यात चांगली माहिती आहे. 
    मेहरबानांस जाहीर व्हावे,
    आपला,
    विसोबा.

    Reply
  4. विसोबा हा तुमचा लेख मला आवडला. तुकारामांचा हिंदी अभंग (दुसरा एक)प्रथम परिचित झाला तेव्हा मलाहि नवल वाटले होते. तो अभंग आहे ’मै भूलि घर जानी बाट। गोरस बेचन आयो हाट। ... वगैरे ’. मी गाथा काढून खात्री करून घेतली कीं खरंच तुकारामांचे हिंदी अभंग /गौळणी आहेत! ते अर्थातच मराठीसारखेच सरस आहेत यात नवल नाही.

    Reply
  5. माझ्या ब्लॉगची ओळख इतराना करून दिल्याबद्दलहि धन्यवाद. माझा mymahabharat.blogspot.com हाहि ब्लॉग आपण जरूर पहावा.

    Reply
  6. रा.रा. विसोबा,

    तुकारामांविषयीचे दोन्ही लेख अतिशय आवडले. तुम्ही खूप उत्तम काम करत आहात हे वेगळे सांगणे नलगे. नेमाड्यांनी साहित्य अकादमीसाठी लिहिलेल्या 'तुकाराम' नावाच्या छोटेखानी पुस्तकात तुकारामांवर ख्रिस्ती धर्मप्रसारकांचाही मोठा प्रभाव पडला होता असे लिहिले आहे. किंबहुना विठ्ठल या एकाच देवाची भक्ती वारकरी भक्तीसंप्रदायातील सर्वांनी करावी यामागे तुकारामांवर एकेश्वरवादी इतरधर्मीयांचा असलेला प्रभाव हे महत्त्वाचे कारण आहे.

    तुकारामांविषयी अधिक काही माहिती मिळाल्यास जरूर द्यावी.

    लोभ असावा ही विनंती.

    Reply
  7. ra. ra. aajanukarn,
    ekeshwari bhakti aani tukaram... ha ek mahatvacha mudda aapan namud kela aahe.
    khare tar to adhik vistarane lihayala hava.
    thank you.

    Reply
  8. विसोबा,

    तुकोबांच्या काळात मुस्लीम राजवटीचा प्रभाव असल्यामुळे त्यांचे काही भक्त सुफी असले तर त्यात काय नवल. पण तुम्ही गुरु ही सुफी होते ते लिहीता तेव्हा तो वाचन्यासारखा विषय होतो. माझ्या काकांनी संत तुकारामावर संशोधन केले आहे. ( संत तुकारामांची जिवननिष्टा - डॉ ल.का. मोहरीर). पण त्यात त्यांनी तुकारामचे गुरु सुफी वा ईतर धर्मीय असतील असे लिहीलेले नाही. त्यांनी तो ग्रंथ लिहीताना ढेर्यांसोबत काम केले आहे. मराठी व्यतिरिक्त लेखन फक्त तुकोबांनीच केलेले नाही तर नामदेवाने पण केले आहे. शिखांच्या धर्मग्रंथात त्यांचा अनेक ओव्या दिसतील. त्यामुळे फक्त हिंदीत लिखान केल्यामुळे गुरु सुफी असतील असे वाटत नाही. 
    राहीला प्रश्न त्यांच्या गुरु पैकीं कोणी सुफी धर्माशी निगडीत होत का? असले तरी काय फरक पडतो. शिवाजी राजांना अनेक गुरु होते पण त्या गुरुंचा प्रभाव त्यांचावर म्हणावा तितका न्हवता तसेच तुकोबांचे पण होऊ शकते. ( जात जाता तुकोबा पण शिवाजींचे गुरु असल्यामुळे शिवाजी पण सुफी होतात का?)

    Reply
  9. dear kedar,

    तुकोबांचे परात्परगुरू जन्माने सूफी मुस्लिम होते की काय, हे खरे तर महत्त्वाचे नसतेच. त्यांचे एक चरित्र सूफी अवलियाचे आहे आणि त्यांच्या भक्तगणांत हिंदूंप्रमाणेच मुस्लिमही आहेत, ही गोष्ट महत्त्वाची!

    visobane lihilele varil vakya aapan vachalet kay?
    tyat tyanchi bhumika ali ahe ase mala vatate.

    Reply
  10. सुफि पंथ म्हणजे देव भोळ्या हिंदुना धर्मांतरा साठी उद्युक्त करण्यासाठी निघालेला पंथ होता..रहिम व राम एकच होता असे सांगत अनेक लोकांचे धर्मांतर झाले होते..मुसलमान लोक अल्ला शिवाय कुणालाच मानत नाहित..मुगल राजवटीतले ते एक षडयंत्र होते..

    Reply
  11. तुकोबारायांच नात सुफि पंतासी जोडण म्हणजे महाराजांचा अपमानजनकच

    Reply
  12. आज च्या परिस्थिथिमधे प्रथम श्री तुकाराम महाराज समजन्यसाठी स्वताहाचे आत्म परीक्षण व् दीर्घ मनाचा अट्टहास, मानस ठेवून च ध्यान साधनेतील व्यक्तीच् वेळ काढू शकते ...तर वाट्याला फलित आहे ....

    Reply
  13. तुकाराम महाराज सुफी संता प्रमाणे जिवंत समाधी घेतलेली नाही तर ती एका समाजाची भूल आहेत कि ते सदेह वैकुंठी गेलेत. वास्तवात त्यांना जिवंत जाळण्यात आलेले आहे.

    Reply
  14. Tukaram maharaj pandharpurla jatastana gavat mukkamala konihi jaga n dilyane mashidit rahile hote tya veli tyanni abhe Hindi abhang rachale hote tyamule ha sarv bhram pasarala aahe tyanchya guruparampatebabat shanka aslyas sant nilibha yancha abhang pahava-Mukhya mahavishnu chaitanyache mul
    Rahata rahila prashna vikut gamanababat tar je tukarammaharaj swabhaktine shivaji maharajanna musalmanachya tavditun sodavatat te swatahche rakshan karu shakat nahit itake dubale hote ka? 
    Dusare ase ki manasachya karyavarun tyache mulyamapan vhave n ki tyacha shevatavarun

    Reply
  15. तुकाराम महाराज पंढरीला जाताना गावात मुक्कामाला कोणीही जागा न दिल्याने मशिदीमध्ये राहिले होते त्यावेळी त्यांनी हे हिंदी अभंग रचले होते त्यामुळे हा सर्व भ्रम पसरला आहे त्यांच्या गुरु परंपरेबाबत शंका असल्यास संत निळोबा यांचा अभंग पहावा- मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ
    राहता राहिला प्रश्न वैकुंठ गमनाबाबत तर जे तुकाराम महाराज स्वभक्तीने शिवाजी महाराजांना मुसलमानांच्या तावडीतून सोडवतात ते स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत इतके दुबळे होते का?
    दुसरे असे की माणसांच्या कार्यावरून त्याचे मूल्यमापन व्हावे न की त्याच्या शेवटा वरून

    Reply

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट